Friday, June 8, 2012
प्रियसंदीपसर, २० फेब्रु. २०११
आपण आपले विचार आम्हा भारतीयापर्यंत पोचवण्यासाठी हे पुस्तक लिहिले म्हणून आपले आभार आणि ते सामान्य माणसांपर्यंत पोहोचावे म्हणून ते मराठीत लिहिले म्हणून त्रिवार अभिनंदन!!!
"आपल्या देशाचे काय होणार?", "आपला देश ह्या राजकारण्यांनी उद्योजकांना विकायला काढला आहे", "सर्व राजकारण्यांना एका लाईनीत उभे करून गोळ्या घालायला पाहिजेत" असे हतबलतेचे आणि उच्च निराशा व्यक्त करणारे उदगार आम्ही सामान्य लोक नेहमी काढत असतो पण कधी विचार करत नाही की "मी" ह्या बाबतीत काय करू शकतो, हा देश इतर विकसित देशांबरोबर येण्यासाठी मी आजपर्यंत काय केलंय? अनेकदा इच्छा असूनही, खूप काही करावेसे वाटूनही योग्य मार्गदर्शन मिळत नाही, योग्य दिशा सापडत नाही. आपले हे पुस्तक अश्या ह्या भरकटलेल्या नौकांसाठी दीपस्तंभाचे काम करेल अशी मला खात्री आहे. आपले पुस्तक म्हणजे देशाला ओरबाडून खाणाऱ्याना एक सणसणीत चपराक आहे, स्वतः काही ना करता फक्त टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात घालण्यासाठी एक झणझणीत अंजन आहे.
ह्या पुस्तकात आपण फक्त आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचे विवेचन करून अथवा पुढील ५०० ते ६०० वर्षात काय होईल हे सांगून थांबला नाहीत तर ही परिस्थिती आपणास कशी बदलता येईल याचे सोदाहरण विवेचन केले आहे. आपण इतर विचारवंताप्रमाणे फक्त पुस्तकी ज्ञान देऊन थांबला नाहीत तर "Strategic Foresight Group" च्या माध्यमातून त्याला कृतीची जोडदेखील दिली आहे.
मी ऐतिहासिक आणी सामाजिक आशयाच्या काही कादंबऱ्या वाचल्या आणी त्यांचा आवाका पाहून माझी छाती दडपून गेली होती पण आपले पुस्तक वाचले आणी माझी मतीच गुंग झाली. जगातील जवळ जवळ सर्वच प्रमुख देशांबद्दल तुमचा अभ्यास आणी त्यांच्या विकासाबद्द्दलची तुमची माहिती पाहून अचंबा वाटतो. आपण केलेला अभ्यास आणी त्या आधारे मांडलेली मते आणी सिद्धांत यांना तोड नाही, भारताला जर का खरोखरचा विकास करावयाचा असेल तर आपले विचार आम्हा सामान्य भारतीयांनी कृतीत आणणे आवश्यक आहे.
आपण पाकिस्तान सरकार आणी लष्कराबद्दल जी मते मांडली आहेत ती अगदी योग्य आहेत, वास्तविक आपल्यासारखे जागतिक स्तरावरचे विचारवंत अशी मते उघडपणे मांडताना दिसत नाहीत. आपण केवळ आपली मते परखडपणे मांडलीच नाहीत तर सोदाहरण पाकिस्तानी लष्कराचा दुटप्पीपणा सिद्ध केला आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर मागील दाराने दहशतवाद्यांना रसद पुरवीत राहील तोपर्यंत त्यांच्या दिवाणखान्यात बसून चर्चा करून भारत सरकारला काहीही सध्या होणार नाही. अश्या या बोटचेप्या व गुळमुळीत धोरणांनी काश्मीर आणी पर्यायाने दहशतवादाच्या प्रश्नांची उकल होणार नाही.
जागतिक राजकारणात आणी पर्यायाने नेत्यांत असलेला दरारा, जागतिक घडामोडींचा असलेला प्रचंड अभ्यास व जवळपास ५० राष्ट्रअध्यक्ष्यांशी केलेल्या सल्ला - मसलती असे सर्व राष्ट्रोपयोगी भांडार आपणापाशी असूनदेखील भारत अथवा महाराष्ट्र सरकारने आपला फारसा उपयोग केलेला दिसत नाही हे आम्हा भारतीयांचे दुर्दैव आहे. नजीकच्या काळात त्यांना जगातील इतर राष्टांप्रमाणे सुबुद्धी सुचेल आणी आपल्या ज्ञानाचा आणी दूरदर्शी विचारांचा फायदा आपल्या देशालाही होईल अशी आशा धरतो.
देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी असणाऱ्यांना मात्र योग्य दिशा सापडत नसणाऱ्या माझ्यासारख्या तरुणांना हे पुस्तक नक्कीच "एका दिशेचा शोध" घेण्यास मदत करेल आणी आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल असेल.
सुनिल बावतीस डि'मेलो
वसई
Subscribe to:
Posts (Atom)