आजकालचा जमाना हा "भाषा आणि संस्कृती बचाव" वाल्यांचा आहे. भारताच्या निरनिराळ्या प्रांतात त्या त्या ठिकाणची भाषा व संस्कृती वाचविण्यासाठी सामाजिक चळवळी सुरु आहेत. आपल्या महाराष्ट्रात तर या चळवळीनी राजकीय रूप धारण केले आहे. मराठी भाषा आणि संस्कृती बचावच्या नावाखाली काही राजकीय पक्षदेखील उदयास आले आहेत आणि त्यांना लोकांचा उदंड प्रतिसाद देखील मिळत आहे. राजकीय पटलावर त्यांची दखल घेतली जात आहे.
हे राजकीय पक्ष प्रत्यक्ष काय करताहेत ह्यापेक्षा ते कोणत्या हेतूने आणि जाणीवेने निर्माण झाले आहेत अथवा करण्यात आले आहेत हे अभ्यासणे महत्वाचे ठरेल. मराठी भाषा - संस्कृती वर आक्रमणे होत आहेत. मराठी भाषेचा शुद्धपणा कमी होत चाललेला आहे ही बाब जरी खरी असली तरी ह्याला जबाबदार मराठी माणसेच आहेत. जेव्हा मराठी माणूस महाराष्ट्रात (मुंबईत नव्हे, मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे) देवाणघेवाणीसाठी मराठी सोडून इतर भाषा वापरू लागला तेव्हापासूनच मराठीला ही दुरावस्था आली. महाराष्ट्रातील व्यापारी व दुकानदार हे मुख्यतः बिगर मराठी आहेत आणि त्यांना इथली स्थानिक भाषा शिकण्यास भाग पाडण्याऐवजी मराठी माणसेच त्यांची अथवा हिंदी भाषा बोलावयास लागल्याने त्यांचे चांगलेच फावले. पर्यायाने मराठी माणसे व मराठी भाषा व्यवहारात मागे पडत गेली. आता तर मराठी व्यावहारिक भाषा म्हणून गणलीदेखील जात नाही.
हा मराठी भाषेचा परामर्श एवढ्यासाठी घेतला कि मराठी माणसांनी जी चूक केली त्याचीच पुनरावृत्ती आपण वसईकर करत आहोत. आज आपण आपल्या बोलीभाषेत (कादोडी, वाडवळ, भंडारी) संभाषण करताना कितीतरी मराठी, हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा राजरोसपणे वापर करतो. आपण जे इतर भाषिक शब्द वापरतो त्यासाठी आपल्या भाषेत असणारा शब्द माहित असूनदेखील आपण तो उच्चारण्याचे टाळतो व आपणहून आपल्या भाषेचा विटाळ करतो. मागील पाच - सहा वर्षात मोजदाद करण्यापलीकडे परभाषिक शब्द आपल्या भाषेत ठाण मांडून बसले आहेत आणि दुर्दैवाची बाब म्हणजे बोलीभाषेच्या अशुद्धीकरणाची ही चळवळ आपणच हाती घेतली आहे.
काही तथाकथित समाजसुधारक जे नेहमी बोलीभाषा टिकली पाहिजे, ती मोठ्या प्रमाणात वापरली गेली पाहिजे म्हणून भाषणे देतात आणि नियतकालिकात मोठमोठाले लेख लिहितात तेच जेव्हा आपापसात मराठीत बोलताना दिसतात तेव्हा त्यांची कीव येते. जेव्हा दोन सामवेदी बोलीभाषिक एकत्र येतात तेव्हा त्यांनी आपल्या बोलीभाषेतच संभाषण करावे. जेव्हा कोणी इतर भाषिक सोबत असेल तेव्हा मराठी भाषा वापरावी पण कोणी मराठी भाषेस नवखा असेल तर जरूर हिंदी भाषेचा वापर करावा. मात्र त्यास आपली अथवा मराठी भाषा शिकण्यास प्रवृत्त करावे. संभाषणात प्राधान्यक्रम, प्रथम बोलीभाषा नंतर मराठी आणि गरज भासल्यास राष्ट्रभाषा हिंदी असा असावा.
इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतलेल्यांना आणि काही समाजसुधारकांना असे वाटते कि संभाषणात काही इंग्रजी आणि हिंदी शब्द घुसवले म्हणजे आपली भाषा फार उच्च झाली, प्रगत झाली; पण हा त्यांचा पोरकट विचार अनेकदा हास्यास्पद संवादात रुपांतरीत होतो. आपल्या भाषेतील शब्द सोयीस्कररित्या वगळून त्याजागी विनाकारण मराठी शब्द वापरले जातात हे आपणास खालील उदाहरणावरून कळेल.
कादोडी शब्द मराठी शब्द
कुण्यात - भावजी
स (६) - सहा
दा (१०) - दहा
हाकोटे - सकाळी
हांचापारा - संध्याकाळी
हा - होय
हिनवार - शनिवार
हव्वार - सोमवार
वानगीदाखल दिलेले वरील शब्द जरी कमी वाटत असले तरी त्यांचा व इतर शब्दांचा वावर आपल्या बोलीभाषेत भरपूर प्रमाणात वाढला आहे व त्यामुळे आपली भाषा पोखरली जातेय तिचे मूळ सौंदर्य नष्ट होत चाललेय. हे सर्व थांबवायचे असेल तर आपण सर्वांनी आपल्या शुद्ध बोलीभाषेतूनच संभाषण करावयास हवे.
आई - बाबा कामाला जात असल्याने दिवसभर आजी - आजोबांच्या सानिध्यात असणारी लहान मुले खूप वेळेला अगदी शुद्ध कादोडी शब्द वापरताना दिसतात मात्र मोठे झाल्यावर त्यांना त्या शब्दांचा विसर पडतो व ती देखील आपल्याप्रमाणे कीड लागलेली व पोखरलेली भाषा बोलू लागतात.
जर आपण २० वर्षांची राजकीय गुलामगिरी झुगारून देऊ शकतो तर ही भाषिक गुलामगिरी का म्हणून झुगारु नये. आपल्या भाषेवरील आक्रमणाचा वेग इतका आहे की आपणास "कादोडी नवनिर्माण सेना" स्थापवायासही वेळ मिळणार नाही.
सुनील बावतीस डि'मेलो
वटार - बारोडी
स्वाभिमानी वसईकरच्या जुलै २०१० अंकांतून साभार...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment